रत्नागिरी : आणीबाणीतील ७२ बंदिजनांना पेन्शन

0

रत्नागिरी : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या बंदीजनांना राज्य सरकारमार्फत पेन्शन सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ७२ जणांना पेन्शन सुरू करण्यात आली आहे. सन् १९७५ ते १९७७ या कालावधीत देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. यावेळी देशभरात अनेक सत्याग्रहींना तुरुंगात टाकण्यात आले होते. राज्यातही प्रत्येक जिल्ह्यात अनेकांना बंदीवास सोसावा लागला होता. यामध्ये रत्नागिरीतीलही बंदीजनांचा समावेश होता. भाजपा सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या बंदीजनांना पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. योजनेचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्व जिल्ह्यातून नोंदणीकृत माहिती मागविण्यात आली होती. पेन्शन योजनेचा निर्णय झाल्यानंतर शासनाने सत्याग्रहामध्ये सहभागी असलेल्या सत्याग्रही किंवा त्यांची पत्नी यांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तेव्हा नोकऱ्या गमावणारे अनेकजण आता गरिबीत जगत आहेत. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यानुसार जिल्ह्यातून दापोली १०, चिपळूण २६, गुहागर ६, संगमेश्वर ३, रत्नागिरी १५, राजापूर ११, लांजा १ अशा ७२ बंदीजनांना पेन्शन सुरू करण्यात आली आहे. २९ जणांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगवास भोगलेल्या महिन्यांच्या आधारे पेन्शनची रक्कम निश्चित केली आहे. एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार रुपये तर त्यांच्या पश्चात पत्नी किंवा पतीस पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येते. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक रुपये पाच हजार तर त्यांच्या पश्चात पत्नी किंवा पतीस अडीच हजार रुपये मानधन दिले जात आहेत. जिल्ह्यातील ५७ लाभार्थांना १० हजार रुपये पेन्शन प्रतिमहा दिली जाते. वर्षभरात ६८ लाख ४० हजार रुपयांची पेन्शन देण्यात आली. १५ लोकांना पाच हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते. वर्षभरात ९ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here