शेतकऱ्यांची माथी भडकवून आंदोलन, उदय सामंत यांचा रोख कुणावर?

0

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने भूमिका जाहीर केली आहे.

आज बारसू येथील शेतकऱ्यांनी पोलिसांचा विरोध जुगारून सुरू असलेले सर्वेक्षण रोखण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांसोबत सरकार चर्चा करायला तयार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आडून कोणी राजकारण करू नये असे आवाहन केले आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचे काम पुढारी काम करत असल्याचा टोला नाव न घेता मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. यामध्ये सामंत यांचा रोख शिवसेना ठाकरे गटावर होता. विनायक राऊत, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सामंत यांचा रोख होता.

उदय सामंत म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवस किंवा त्याच्यापेक्षा अगोदरपासून प्रशासन हे तिथल्या लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये प्रशासन यशस्वी देखील झालेले आहे, काल देखील चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील प्रशासन यशस्वी झालं आहे.

याचमुळे काही लोकांना हे रुचत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन काही पुढारी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात ते कोणी करू नये. चर्चेला शेतकऱ्यांबरोबर कालही मी तयार होतो. आजही तयार आहे आणि भविष्यामध्ये देखील तयार राहणार आहोत.

कुठेही शेतकऱ्यांना डावलून हा प्रकल्प पुढे जाणार नाही. शेतकऱ्यांच्या मनातल्या सगळ्या शंका सरकार दूर करेल. त्या पद्धतीने आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे. गावागावांमध्ये जाऊन प्रशासन शंका दूर करेल ही देखील कार्यवाही सुरू केलेली आहे. परंतु माथी भडकवण्याचं काम जी काही लोक करतात त्यांनी ते काम थांबवावं असे आव्हान मंत्री सामंत यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना पुढे करून ज्या पद्धतीने राजकारण करताय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. विनायक राऊत यांच्या आंदोलनापेक्षा त्यांना देखील आमची विनंती आहे की त्यांना जर काही शंका असतील तर त्या देखील प्रशासनामार्फत दूर करू असे उदय सामंत म्हणाले आहे.

विनायक राऊत तिथे गेले म्हणून त्यांना ताब्यात घेतलं. आंदोलक होते त्यांच्या हातात शिवबंधन होतं. शिवसेनेने तिथं लोकं आणून आंदोलन केले आहे. असे राजकारण ठाकरे गटाने करू नये असेही उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. मुख्यमंत्री यांची आंदोलकांना भेट घ्यायची आहे ती देखील भेट करून देऊ असेही उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

12 जानेवारी 2022 ला ग्रामस्थांच्या विरोधात हे पत्र दिले गेले, त्यावेळी ग्रामस्थांचा विचार करायला पाहिजे होता. पत्र दिलं त्याप्रमाणे सर्वेक्षण सुरू झालं आणि आता आपण आंदोलन करताना सोबत आहात. प्रशासनातले अधिकारी त्यांचे देखील शंका जाऊन दूर करू शकतील पण कुठेही राजकीय भांडवल करू नये असेही उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 28-04-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here