यूपी सरकारचा यू-टर्न; विशेष ट्रेन बंद करणार नाही

लखनऊ : स्थलांतरीत मजुरांसाठी चालवण्यात येत असलेल्या श्रमिक विशेष ट्रेन पुढच्या आठवड्यात बंद करण्याचा आदेश उत्तर सरकारने मागे घेतला आहे. इतर राज्यांमधून उत्तर प्रदेशातील स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली आहे. यामुळे बस आणि ट्रेनची गरज आता पडणार नाही, असं उत्तर प्रदेश सरकारनं आधीच्या आदेशात म्हटलं होतं. पण आता हा मागे घेत यूपी सरकारने स्थलांतरीत मजुरांसाठी मोफत विशेष ट्रेन सुरूच राहतील, असं स्पष्ट केलं आहे. एका आठवड्यात यूपी सरकारने घेतलेला हा तिसरा यू-टर्न आहे. राज्यात आतापर्यंत २७ लाख मजूर परतले आहेत. त्यांना ट्रेन आणि बसची निशुल्क सेवा उपलब्ध करण्यात आली होती. सर्व मजूर सुरक्षितपणे परतत नाही तोपर्यंत ही सेवा पुढेही सुरू राहील, अशी माहिती अप्पर मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी दिली. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांची सुरक्षितपणे घरवापसी करण्यास उत्तर प्रदेश सरकार कटिबद्ध आहे, असं राज्य सरकारच्या प्रवक्त्यानेही सांगितलं. संबंधित राज्य सरकारांनी इच्छुक स्थलांतरीत मजुरांची यादी आम्हाला द्यावी. यामुळे त्यांच्यासाठी मोफत ट्रेनची व्यवस्था करता येईल. संपूर्ण देशातून स्थलांतरीत मजुरांसाठी मोफत ट्रेन चालवण्यात येत आहेत आणि त्या पुढेही सुरू राहतील. सर्व इच्छुक कामगार राज्यात परतत नाही तोपर्यंत या श्रमिक विशेष ट्रेन सुरू राहतील, असं प्रवक्त्याने स्पष्ट केलं.एक आठवड्यातील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा हा तिसरा यू-टर्न आहे. स्थलांतरीत मजुरांना कामावर घेण्यापूर्वी राज्यांनी यूपी सरकारची परवानगी घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. पण सरकारवर जोरदार टीका झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. एल-२ आणि एल-३ आयसोलेशन वॉर्डमध्ये करोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. पण मोबाइलमुळेही करोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या वॉर्डमध्ये मोबाइल वापरण्यास बंदी आहे, असं डीजीएमई डॉ. के.के. गुप्ता म्हणाले होते. सर्व सरकारी मेडिकल कॉलेजेस , सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स हा आदेश देण्यात आला होता. पण हा आदेश रद्द केला गेला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:40 PM 29-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here