रत्नागिरी : जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वाठार, वाघवाडी, मसूर येथील अॅम्ब्युलन्सतर्फे पुरात अडकलेल्या वाहनचालक, प्रवाशांना मदत करण्यात आली. त्यांना औषधे मिळवून देणे, अजारी लोकांना दवाखान्यात नेणे असे सेवा कार्य सुरू आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. अनेक वाहने, प्रवासी वाटेत अडकून पडले आहेत. संस्थानच्या वाठार, वाघवाडी, मसूर अशा तीन ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी तीन अॅम्ब्युलन्स आहेत. वाठार येथील अॅम्ब्युलन्सवर संग्राम चौगले व वाघवाडी येथील रुग्णवाहिकेवर नीलेश धोत्रे व मसूरला राजेंद्र साळुखे चालक आहेत. तिन्ही ठिकाणी महापुरामुळे अनेक वाहने अडकून पडली आहेत. श्री. चौगुले, श्री. धोत्रे व श्री. साळुखे यांनी त्या त्या ठिकाणच्या अडकून पडलेल्या वाहनधारक, प्रवासी व पूरग्रस्तांची विचारपूस केली. त्यांना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना औषधे आणून देणे, जे जास्त आजारी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करणे असे काम सुरू केले आहे. वाघवाडी येथे इस्लामपूर, पेठनाका येथील डॉक्टर्सनी संस्थानच्या अॅम्ब्युलन्समध्येच पुरामुळे अडकलेल्या लोकांवर उपचार केले. डॉ.टी. एस. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. विशाल दंडवते, डॉ. मानसिंग पाटील आदींनी ही मोहीम राबविली. मसूर येथेही तेथील प्रा. आ. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी संस्थानच्या रुग्णवाहिकेत उपचार केले. हे संस्थान नेहमीच नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांच्या मदतीला धावले आहे. संस्थानच्या पुणे-बंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगाव, वाठार, वाघवाडी, मसूर फाटा, पाचवड व कापूरहोळ येथे अपघातग्रस्तांसाठी मोफत अॅम्ब्युलन्स सेवा कार्यरत आहे. संस्थानच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
