रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी संघटनांच्यावतीने रत्नागिरी येथे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उदय पेठे यांना निवेदन देण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने छोटे राष्ट्रध्वज विकत घेतले जाऊन त्यानंतर ते रस्त्यात, कचरा कुंडीत अथवा गटारात पडलेले आढळतात. हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या निर्मिती आणि विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री आणि वितरण होऊ नये, यासाठी रत्नागिरीमध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उदय पेठे यांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांसाठी सूचना पत्र काढू, असे उदय पेठे यांनी सांगितले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे देवेंद्र झापडेकर, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, हिंदुराष्ट्र सेनेचे रत्नागिरी अध्यक्ष सागर कदम, तेजस साळवी, अभिषेक खरात, प्रसाद गवाणे, सनातन संस्थेचे शशिकांत घाणेकर, हिंदू जनजागृती समितीचे विष्णू बगाडे, संजय जोशी उपस्थित होते. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. संस्थेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
