अहमदाबाद : ‘चांद्रयान २’ वेगाने चंद्राच्या दिशेने कूच करत असून २० ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान २ चंद्रावर उतरेल, अशी माहिती इस्रोप्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली. चांद्रयान पुढच्या दोन दिवसांत पृथ्वीची कक्षा सोडेल, असेही ते म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक आणि ‘इस्रो’चे संस्थापक दिवंगत डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्म शताब्दी निमित्त येथे आयोजित कार्यक्रमाला सिवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, २२ जुलै रोजी चांद्रयान २ चे यशस्वी प्रक्षेपण झाले. या यानाचा प्रवास अपेक्षेप्रमाणे सुरू असून सध्या हे यान पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. आता बुधवारी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी चांद्रयान २ पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. साधारण २० ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, असे सिवन म्हणाले.
