शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेण्यास नरेंद्र मोदी अनुकूल; शरद पवारांचा खुलासा, राजकीय चर्चांना उधाण

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले आहे.

पहाटेचा शपथविधी, जून महिन्यातील सत्तांतर यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही या पुस्तकात भाष्य केलं आहे.

२०१९ च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्याने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता. ‘मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाने खमंग राजकीय चर्चा झाली होती. शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती, असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी लोक माझे सांगती पुस्तकात केला आहे.

शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापनेचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याने शिवसेनेत भाजपच्या विरोधात खदखद अधिक वाढली होती. तेव्हाच राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या काही निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवाद झाला होता. मी या प्रक्रियेत सहभागी नव्हतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रस्तावावर आमच्या पक्षात विचारविनिमय झाल्यावर भाजपबरोबर जायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचं शरद पवारांनी या पुस्तकात स्पष्ट केलं आहे.

राजकीय संभ्रम राहू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब घालायची असेही ठरले. संसदेचे अधिवेशन सुरू असताना मी मोदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. ‘आम्ही तुमच्याबरोब यावे ही अपेक्षा कळत नकळत व्यक्त होत आहे. परंतु अशी राष्ट्रवादीची कोणत्याही प्रकारे इच्छ नसल्यानेच गैरसमज टाळण्याकरित मी मुद्दाम भेटीला आलो आहे’ असे मी मोदींना स्पष्टपणे सांगितले होते मोदींनी बारामतीमध्ये माझं अनाठायी स्तुती केली होती तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती शिवसेनेबाबत मोदी यांना फार आपुलकी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असावी यासाठी मोदी अनुकूल होते, अशी माहिती शरद पवारांनी पुस्तकात दिली आहे.

मुंबई केंद्रशासित करण्याचं दिल्लीच्याही मनात नाही-

मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असं शरद पवार यांनी पुस्तकातील पान नंबर ४१७ वर लिहिले आहे. त्यामुळे, शिवसेनेकडून सातत्याने मुंबईचा दाखला देत भाजपला लक्ष्य केलं जातं. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचाही आरोप करण्यात येतो. मात्र, शरद पवार यांच्या विधानामुळे आता शिवसेनेची कोंडी झाली आहे. आता, पवारांच्या या भूमिकेवर शिवसेना काय मत मांडते हे पाहावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 04-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here