रिफायनरीचे शेकडो समर्थक घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

0


रत्नागिरी : बारसू येथे येथील प्रस्तावित रिफायनरीला विरोध सुरू असून, त्यांना भेटण्यासाठी येणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट रिफायनरी समर्थक घेणार आहेत.त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटच्या वतीने केशव भट यांनी सांगितले. हजारोंच्या संख्येने यावेळी समर्थक माजी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

प्रस्तावित रिफायनरीसाठी बारसू परिसरात सर्वेक्षण सुरू असून काही नागरिक व संस्थांमार्फत त्याला विरोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे ६ मे रोजी बारसू परिसरात भेट देऊन विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेणार आहेत.

काही संघटना स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरून विरोधासाठी विरोध करीत आहेत. मुख्यमंत्रिपदी असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करून, बारसू येथे रिफायनरीसाठी हिरवा कंदील दाखवला होता; मात्र आता ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटच्या वतीने रत्नागिरीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी केशव भट यांच्यासह उद्योजक कौस्तुभ सावंत, ठाकूरदेसाई व पदाधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ६ रोजी बारसू दौऱ्यावर येत असताना त्यांनी समर्थकांना भेट द्यावी व त्यांचीही बाजू समजावून घ्यावी, असे मत केशव भट यांनी व्यक्त केले. राजापूरसह जिल्ह्यातील ६४ विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. शेकडोंच्या संख्येने समर्थक ठाकरे यांना भेटण्यासाठी बारसू परिसरात उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here