रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या : उद्धव ठाकरे

0

➡️ रत्नागिरी : बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज बारसू, सोलगाव आणि आजाबाजूच्या गावांचा दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा प्रकल्प पुढे रेटण्यासाठी बळाचा वापर करत असलेल्या सरकारवर घणाघाती टीका केली.

तसेच हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता फॉक्सकॉर्न, गिफ्ट सिटी आणि एअरबस प्रकल्प परत महाराष्ट्राला द्या, असा खोचक सल्ला दिला. उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, गेल्या काही काळात चांगले प्रकल्प गुजरातला गेले. तर वाईट प्रकल्प येथे आणले जात आहेत. मात्र स्थानिकांचा विरोध असेल तर हा रिफायनरी प्रकल्प कोकणात व्हायला नको. हा प्रकल्प चांगला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा प्रकल्प इतकाच चांगला असेल तर त्यासाठी पोलीस बळाचा वापर का केला जात आहे. सरकारकडून होत असलेली दडपशाही पाहता या प्रकल्पामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याची शंका येते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, इतके प्रकल्प बाहेर नेले.

आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या. आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या. कोकणात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे अजिबात चालणार नाही. इथल्या पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. या प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जा. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरांवर वरवंटा फिरवताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर उपस्थितांशी थोडक्यात संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, मी प्रकल्पासाठी पत्र लिहिलं होतं. मात्र लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा असं मी म्हटलं नव्हतं. हुकूमशाहीच्या माध्यमातून हा प्रकल्प लादू नका. राज्य सरकारने हुकूमशाही करून हा रिफायनरी प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही महाराष्ट्र पेटवू. आज मी इथे येऊन उभा आहे. आता जे या प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर या आणि रिफायनरीचं समर्थन करून दाखवावं, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 06-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here