लोटे येथे पाणीपुरवठा खंडित झाल्याने शेकडो कारखान्यांचे करोडोंचे नुकसान; राज आंब्रेंचा आंदोलनाचा इशारा

0

खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत गेले आठ दिवस पाणीपुरवठा खंडित झाला असून वसाहतीमधील शेकडो कारखाने बंद आहेत. परिणामी कारखानदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आम्ही एमआयडीसीकडे नुकसानभरपाईची मागणी करणार असून वेळ पडल्यास आंदोलनही करण्यास तयार आहोत, असा इशारा लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी उद्योग भवन येथे रविवारी दि. ७ रोजी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.

यावेळी राज आंब्रे म्हणाले, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे छोटे-मोठे कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्याचे योग्य ते शुल्क ही आकारण्यात येते आणि ते शुल्क उद्योजक वेळोवेळी भरत असतात. तरीही एमआयडीसीकडून कायमच अनियमित पाणीपुरवठा केला जातो.

यातील बहुतांश कारखाने रासायनिक उत्पादने घेत असताना त्यांना पाण्याची अत्यंत गरज असते. अशावेळी अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्यावर कारखान्यांचे लाखोंचे झाल्यावर कारखान्यांचे लाखोंचे नुकसान होते. काहीवेळा दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली एमआयडीसीकडून शटडाऊन घेतला जातो. त्या शटडाऊनबाबत कोणत्याही प्रकारे लेखी सूचना वा पूर्व कल्पना उद्योजक संघटनेला दिली जात नाही. केवळ व्हाट्सॲपवर एक मेसेज टाकला जातो. याही वेळी रविवार, दि. ३० एप्रिल रोजी रात्री बारा वाजता पाणीपुरवठा खंडित झाला. तेव्हा ‘दुरुस्ती देखभालीसाठी २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे,’ असा व्हाट्सअॅपवर मेसेज टाकण्यात आला. परंतु एमआयडीसीच्या ढिसाळ नियोजनामुळे या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तब्बल सहा दिवस चालले आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील शेकडो कारखानदारांचे उत्पादन ठप्प झाले व कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.

याचबरोबर रासायनिक उद्योग आल्यामुळे पंचक्रोशीतील गावांमधील नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित व नष्ट झालेले आहेत. परिसरातील सर्व जनता व नोकरी व्यवसायासाठी आलेले परप्रांतीय सर्वजण एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असतात. अशावेळी या जनतेला कोणती पूर्वकल्पना नसताना तब्बल सहा दिवस पाणी न आल्यामुळे प्रचंड हाल सोसावे लागले. पंचक्रोशीतील महिला, मुले पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत होते. या सर्व गोष्टीला केवळ एमआयडीसीचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे. येथील शेकडो कारखानदार एमआयडीसीकडे नुकसानभरपाईची मागणी करणार असून वेळ आल्यास सर्व उद्योजक आणि पंचक्रोशीतील नागरिक एमआयडीसीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here