लघुशंकेसाठी ड्रायव्हर उतरताच प्रवाशी तरुण इको कार घेऊन फरार

0

संगमेश्वर : लघुशंकेसाठी प्रवाशाने गाडी थांबवून ड्रायव्हरही लघुशंकेसाठी उतरताच गाडीचा चावी असल्याचा गैरफायदा घेत इको गाडी लांबवल्याची घटना आंबा घाटात घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 मे रोजी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद भीमाशंकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर हे आपल्या ताब्यातील इको गाडी घेऊन नाशिक शिर्डी येथे भाडे घेऊन गेले होते. 3 मे रोजी सायंकाळी 7 वा. पवाशांना औरंगाबाद रेल्वे स्टेशनला सोडून रात्री 8 वा. औरंगाबाद येथे एसटी स्टॅण्डसमोरील लॉजवर राहण्यासाठी गेले. त्याठिकाणी संशयित तरुणासोबत त्यांची ओळख झाली. यावेळी भीमाशंकर यांनी मला रत्नागिरी येथे मशिनरी आणण्यासाठी जायचे आहे असे संशयिताला सांगितले. 4 मे रोजी सकाळी 10 वा. औरंगाबादवरुन रत्नागिरीकडे रवाना झाले. रात्री शाहुवाडी येथे जेवण करुन पुढे मार्गस्थ झाले. 12.15 वाजण्याच्या सुमारास आंबा घाटात गाडी आली असता संशयिताने मला लघुशंकेला जायचे आहे असे सांगितले. त्यामुळे भीमाशंकर यांनी गाडी थांबवली. भीमाशंकरही खाली उतरले. मात्र गाडीची चावी काढण्यास ते विसरले. गाडीतून खाली उतरताच संशयिताने इको गाडीत बसून गाडी चालू केली आणि गाडी घेऊन पळाला. या प्रकरणी भीमाशंकर यांनी देवरुख पोलिसात फिर्याद दाखल केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here