गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला स्टार कॅम्पस अवॉर्ड प्राप्त

0

रत्नागिरी : अर्थ डे नेटवर्क इंडियाच्या वतीने आयोजित स्टार कॅम्पस अवॉर्डच्या ग्रिनरी आणि इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणीमध्ये येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विजेता म्हणून निवड झाली आहे.

ऊर्जा बचत, पाण्याचे योग्य नियोजन, कचऱ्याची विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी या पाच श्रेणींसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे समर्पण आणि पर्यावरणीय टिकविण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमांची दखल घेऊन महाविद्यालयाला हे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

अर्थ डे ऑर्गनायझेशन ही संस्था जगभरात १९० पेक्षा जास्त देशांमधे पन्नास हजारापेक्षा जास्त संस्थांसोबत पर्यावरण संवर्धन क्षेत्रात १९७० पासून कार्यरत आहे. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या अभ्यासक्रमात हवामान साक्षरता समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे ध्येय आहे. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलामध्ये आणि महाविद्यालयांमध्ये नियमितपणे करीत असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांना विविध माध्यमातून देशपातळीवर मांडण्यात येते.

संस्थेमार्फत महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संकुले शाश्वत, पर्यावरणपूरक आणि हरित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून तारांकित परिसर पारितोषिक ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

महाविद्यालयातील परिसरामध्ये आणि महाविद्यालयामार्फत समाजामध्ये पर्यावरणपूरक राबविण्यात येणाऱ्या ऊर्जा बचत, पाण्याचे योग्य नियोजन – पावसाळी पाणी साठवण, रासायनिक आणि जीवशास्त्रीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी जपत दत्तक गावांमध्ये पर्यावरणपूरक या उपक्रमांची नोंद स्पर्धेत घेतली गेली.

जगात पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल या गंभीर समस्या असताना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयासारखी शैक्षणिक संस्था या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रिय उपाययोजना करत आहे. शाश्वत पद्धतींचा अवलंब करून, पर्यावरणीय निरोगी वातावरणासाठी योगदान आणि तरुण पिढीला सकारात्मक कृती करण्यास प्रेरित करत असल्याबद्दल अर्थ डे नेटवर्क इंडियाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन केले.

या पारितोषिकासाठी डॉ. सोनाली कदम यांनी प्रस्ताव तयार केला. त्यांना विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन आणि सचिव सतीश शेवडे यांनी महाविद्यालयाला लाभलेल्या पारितोषिकाबाबत प्राचार्य पी. पी. कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here