रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी पोलीस भरती परीक्षेमध्ये नैपुण्य प्राप्त केले आहे.
अकादमीचे विद्यार्थी माऊली चांगदेव चोरगे, सागर उत्तम पाटील व संपदा अंबरनाथ पाटील यांनी उत्तम गुण मिळवत यश संपादन केले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०२१ ची भरती परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. प्रथम शारीरिक चाचणी ५० गुणांची घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झाल्यावर पुढे लेखी परीक्षा १०० गुणांची घेण्यात आली. माऊली चोरगे (९५ गुण), सागर पाटील (९४ गुण) आणि संपदा पाटील (९२ गुण) यांनी या लेखी परीक्षेत चांगले यश मिळवले.
या तिघांचा सत्कार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भरत ओसवाल, अकादमीच्या समन्वयक अॅड. सोनाली खेडेकर, मनाली साळवी आदी उपस्थित होते.
अकादमीतर्फे एमपीएससी इंटिग्रेटेड बॅच (८ महिने), फाउंडेशन (४ महिने) आणि बॅंकिंग (४ महिने) याकरिता जून महिन्यात कोर्स सुरू होणार आहे. अकादमीची अभ्यासिका असून सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू असते. यातही अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. रत्नागिरीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले.
अरुअप्पा जोशी अकादमीचे विद्यार्थी आदेश अवघडे यांची संरक्षण संशोधन विकास संघटना या भारताच्या संरक्षण खात्यातील लॅब असिस्टंट या पदावर नेमणूक झाली आहे. या पदावर रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली आहे. अकादमीच्या नीळकंठेश्वर धोत्रेकर यांची निवड महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवांतर्गत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता वर्ग १ पदी निवड झाली आहे. त्यांचेही याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 08-05-2023