रत्नागिरी: नवनिर्माण शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात

0

रत्नागिरी : अंजुमन इस्लाम संस्था आणि नवनिर्माण शिक्षण संस्था एकाच ध्येयाने प्रेरित होऊन समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्बळ घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहे.

नवनिर्माण शिक्षण संस्था निःस्वार्थ हेतूने रत्नागिरीमध्ये काम करत आहे. जगातील सर्वोच्च असलेल्या बोस्टन येथील एमआयटी संस्था अंजुमन इस्लाम संस्थेसोबत काम करत आहे, त्याप्रमाणे नवनिर्माणच्या शैक्षणिक चळवळीसोबत अंजुमन इस्लाम संस्था करार करून काम करेल, असे आश्वासन अंजुमन इस्लाम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त डॉ. जहीर काझी यांनी दिले.

येथील एस. एम. जोशी विद्यानिकेतन मध्ये नवनिर्माण शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षारंभ सोहळा आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंटच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सिनेनिर्माते राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, सेलिब्रिटी शेफ नीलेश लिमये, संस्थेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, उपाध्यक्ष डॉ. अलिमियाँ परकार, चेअरमन अभिजित हेगशेट्ये, कार्यवाह परेश पाडगावकर, संचालिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा, आत्माराम मेस्त्री, प्राचार्य आशा जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन न करता संविधानाची मूल्ये, तत्त्वे दर्शविणाऱ्या पट्ट्या झाडावर अडकवून करण्यात आले आणि संविधानाची मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी डॉ. जहीर काझी म्हणाले की, नवनिर्माण संस्थेतील भौतिक सुविधा पाहून मी प्रभावित झालो. रत्नागिरीसारख्या भागात इतक्या उच्य दर्जाची भौतिक सुविधा असू शकते, यावर विश्वास बसत नाही. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन निःस्वार्थ हेतूने काम करीत आहे. ते राष्ट्रसेवा दलाच्या उद्दिष्टाप्रमाणे काम करत आहे, हे खरेच वाखाण्याजोगे आहे. ही संस्था खासगी असूनही कमर्शियल न होता चॅरिटेबल तत्त्वावर काम करत आहे हे कौतुकास्पद आहे.

नितीन वैद्य यांनी आपल्या मनोगतामध्ये अभिजित हेगशेट्ये यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, त्यांच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या. स्वप्ने पाहताना लोकांना जोडत ते सत्यात कसे उतरवायचे, हे अभिजितने सिद्ध करून दाखवले आहे.

प्रवाहाविरुद्ध लढून अभिजित हेगशेट्ये यांनी शिक्षण क्षेत्रातील साम्राज्य उभे केले आहे, असे सांगून डॉ. अलीमिया परकार यांनी त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी सलाम केला. डॉ. सुरेश जोशी म्हणाले, हेगशेट्ये यांनी अनवाणी पायांना नवनिर्माणच्या माध्यमातून बळ दिले. कोणाचेही फॉलोअर न होता त्यांनी नवनिर्मिती केली. हा वारसा सांभाळायचा, वाढवायचा आणि वाटायचा याची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

अभिजित हेगशेट्ये यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा हेगशेट्ये यांनी इंग्रजीमधून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. आत्माराम मेस्त्री, सेलिब्रिटी शेफ नीलेश लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. आशा जगदाळे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here