Karnataka Election 2023 : पक्ष कोणताही असो, मतदान मराठी उमेदवारालाच करा; राज ठाकरेंचं सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन

0

मुंबई : “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असो, मतदान मराठी उमेदवारालाच करा,” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना केलं आहे.

शिवाय निवडून आल्यावर या उमेदवाराने मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवरील अन्याय याविरोधात विधानसभेत वाचा फोडायला हवी, असंही त्यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. मराठी भाषिक आणि कन्नडिगांमधील वाद कायम आहे. त्यातच कर्नाटकात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी उमेदवारांनाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांनी कन्नड भाषा आणि संस्कृतीचा मान राखतात. तरीही सरकारकडून मराठी माणसांना त्रास दिला जात असेल किंवा गळचेपी होत अशेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोक असायला हवीत. 10 मे रोजी संधी आहे, मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे या म्हणाले?

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे रोजी मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हटलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोक असायला हवीत.

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे रोजी संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here