कवी केशवसुत स्मारक मालगुंड वर्धापनदिनाच्या निमित्ताने….

0

एक तुतारी द्या मज आणुनी,
फुंकीन जी मी स्व – प्राणाने…


असे म्हणत मराठी साहित्यामध्ये एका नवविचाराने प्रेरित होऊन, लिखाण करणारे कवी म्हणजे कवी केशवसुत. ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत समाजातील वाईट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, अज्ञान, अस्पृश्यता इत्यादी समाजविघातक बाबींवर टीका करत लेखन केले. अशा महान कवीचा परिचय, त्यांचे साहित्यिक कार्य संपुर्ण जगासमोर आले पाहिजे, या उदात्त हेतुने प्रेरित होऊन ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी, कवी केशवसुत यांचे जन्मगावी म्हणजेच मालगुंड येथे असलेल्या कवी केशवसुत यांच्या घराचे भव्य स्मारक करण्याचा संकल्प केला. त्या संकल्पाच्या पुर्ततेसाठी मालगुंड ग्रामस्थ आणि सर्वांचेच सहकार्य मिळविण्यासाठी दिवसरात्र एक करत स्मारक उभारले.

आणि या मराठी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण बनत असलेल्या या स्मारकाचे ०८ मे १९९४ रोजी मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, नाटककार कवी कुसुमाग्रज आणि सुप्रसिद्ध लेखक आणि साहित्यिक पु. भा. भागवत यांच्या हस्ते झाले. या स्मारकाचे आणि कवी केशवसुत यांचे कार्य लक्षात घेऊन मालगुंड ही कवितेची राजधानी तर कवी केशवसुत स्मारक हे काव्यतीर्थ असल्याचे सांगितले होते. त्याच अनुषंगाने मागील २९ वर्ष साहित्य, साहित्येतर क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्मारकाची ख्याती लक्षात घेऊन या स्मारकात भेट देत कवी केशवसुत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीची धुळ आपल्या मस्तकी लावत स्वतःला धन्य झाल्याचे मान्य केले आहे.

त्या घटनेला आज २९ वर्ष पूर्ण झाली. २९ व्या वर्धापनदिनाच्या सर्वांना खुप – खुप शुभेच्छा!!
या स्मारकाच्या उभारणीत तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्यासह महाराष्ट्र शासनातील मंत्री महोदय आणि प्रशासनाच्या वतीने खंबीर साथ देत वेगवगळ्या टप्प्यावर निधी उपलब्ध करून देत स्मारक अत्याधुनिक करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनीदेखील विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.

पाठ्यपुस्तकात अभ्यासाला असणा-या कविता ह्या केशवसुत यांच्या आहेत, ते कवी केशवसुत कसे होते, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे साहित्य, त्यांच्या कविता आणि कार्य या स्मारकात आल्यानंतर आपल्या लक्षात येते.

आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कवी केशवसुत यांचे स्मारक संस्मरणीय बनवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड प्रयत्नशील आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कवी केशवसुत स्मारकाची ख्याती सर्वदुर जात आहे. परिणामी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन अनेक साहित्यप्रेमीसह भाषा आणि साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत, नवोदित आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून स्मारकाचे कौतुक करत असतात.

या स्मारकात आपल्याला कवी केशवसुत यांचे जन्मभर, केशवसुतकालीन वस्तू संग्रह, कवी केशवसुत यांच्या कवितांचे काव्यशील्प, मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवींचा अल्पपरिचय, त्यांच्याच कवितांचे भव्य काव्यदालन, वाचनालय, ग्रंथालय, खुले सभागृह, गंगाधर गाडगीळ दालन हे व असे अनेक प्रकल्प याठिकाणी पहायला मिळतात. महत्वाचे म्हणजे अत्यंत नम्रपणे स्वागतासाठी तयार असणारा कर्मचारी वर्ग येणा-या सर्वांना अदबीने माहिती देत स्वागतासाठी तयार असतो.
ज्या उदात्त हेतुने प्रेरित होऊन आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुत स्मारकाची उभारणी केली, तो हेतु आज स्मारकाचे कामकाज आणि विस्तार पाहता पुर्ण झाल्याचे मान्य करायला हवे. आणि आजही
नव्या मनुतील नव्या दमाचा शुर शिपाई आहे…..

याप्रमाणे आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त रमेश कीर,अरूण नेरूरकर, रेखा नार्वेकर यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ स्मारक अजुनही अद्ययावत व अत्याधुनिक करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात असे स्मारक आढळणार नाही असे आम्ही सर्वजण धाडसाने म्हणत असतो. अशा स्मारकाचा भाग असल्याचा खुप अभिमान वाटतो.

अशा या एकमेव कवींच्या स्मारकाच्या स्थापनेला २९ वर्षे पुर्ण होत असताना शासनदरबारी केलेल्या अनेक विनंत्या पुर्णत्वाच्या मार्गावर जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आणि शासनाचा साहित्य चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहता त्या विनंत्यादेखील लवकरच पुर्ण होत कवी केशवसुत स्मारक अजुनही अद्ययावत व अत्याधुनिक होईल यात शंका नाही. पुन्हा एकदा सर्वाना खुप – खुप शुभेच्छा!!
शुभेच्छुक – श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील,
अध्यक्ष – कवी केशवसुत स्मारक मालगुंड,
ता. जि. रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here