2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फक्त महिलाच सहभागी होणार; संरक्षण मंत्रालयाकडून सशस्त्र दलांना पत्र

0

नवी दिल्ली : 26 जानेवारी 2024 रोजी होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर केवळ महिलांचा समावेश केला जाईल.

परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसतील. संरक्षण मंत्रालयाने लष्करी दल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्याचा उद्देश महिलांना नेतृत्व देणे आणि भविष्यातील नेतृत्वासाठी त्यांना तयार करणे आहे. गेल्या महिन्यात 29 एप्रिल रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यातील बैठकीत निर्णय
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘डी-ब्रीफिंग बैठकीत’ घेण्यात आला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लष्कर, नौदल, हवाई दल, गृह मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर प्रजासत्ताक दिन परेड 2024 मधील कर्तव्यपथावरील परेड दरम्यानच्या तुकडी (मार्चिंग आणि बँड), आणि इतर प्रदर्शनांमध्ये फक्त महिला सहभागी असतील असा निर्णय घेण्यात आला. मार्चमध्ये संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात पत्रही पाठवले होते.

2023 च्या परेडमध्ये नारी शक्ती थीम
यावर्षी 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा यांच्या चित्ररथामध्ये ‘महिला शक्ती’ ही मुख्य थीम ठेवली होती. प्रथमच, लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्या नेतृत्वाखाली 144 सेलर्सच्या तुकडीचे नेतृत्व करण्यात आले. 3 महिला आणि 6 पुरुष अग्निवीर प्रथमच दिसून आले.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार कर्नल गीता राणा अलीकडेच चीनच्या सीमेला लागून असलेल्या संवेदनशील लडाख प्रदेशात युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी बनल्या आहेत. याशिवाय, यावर्षी पहिल्यांदाच लष्कराने महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांना जगातील सर्वात उंच आणि सर्वात थंड युद्धभूमी सियाचीनमध्ये तैनात केले आहे. लष्कराने सुदानमधील अबेई या विवादित प्रदेशात 27 महिला शांतीरक्षकांची सर्वात मोठी तुकडीही तैनात केली आहे.

1950 पासून प्रजासत्ताक दिन परेड
पहिला प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये इर्विन स्टेडियम (आताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम) येथे आयोजित करण्यात आला होता. 1951 पासून राजपथावर (आता कर्तव्यपथ) परेड होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here