स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सह्याद्री खाेऱ्यातील घरे प्रकाशमान

0

पाचल : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सह्याद्रीच्या खाेऱ्यातील कार्जिडा (ता. राजापूर) गावातील ब्राह्मण देव खोरे येथील सहा घरांना महावितरणने वीज देऊन त्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली.

तब्ब्ल ७५ वर्षांनंतर घरात वीज आल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत दिवाळीच साजरी केली. डोंगरदऱ्यात अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या घरांना वीज पुरवठा करणाऱ्या पाचल महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता संदीप बंडगर यांचेही ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले.

काजिर्डा गावात काही वर्षांपूर्वीच वीज आलेली आहे. मात्र, गावापासून पाच ते सहा किलाेमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात ब्राह्मण देव खोरे हा भाग वसलेला आहे. अतिशय दुर्गम भाग असून, येथे सहा ते सात घरांची वस्ती आहे. गेले अनेक वर्षे हे ग्रामस्थ विजेपासून वंचित आहेत. घनदाट जंगल, रस्ता तसेच साधी पायवाटही नाही. अशा दुर्गम भागात वीजपुरवठा करण्याचे अनेकवेळा प्रयत्न निष्फळ ठरले.या दुर्गम भागातील घरांना वीजपुरवठा करणे महावितरणसमोर मोठे आव्हानच होते. संदीप बंडगर यांनी या वस्तीचे तत्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर केला.

१४ लाखांच्या या कामाला रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांनी मंजुरी दिली आणि कामही पूर्ण झाले. अखेर तब्बल ७५ वर्षांनंतर १ मे रोजी या घरात वीज आली आणि ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या वस्तीला वीज पुरवठा करण्यासाठी गावातील ग्रामस्थ, जमीन मालक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचेच सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने महावितरणने दुर्गम भागातील घरात वीज देऊन अनेक वर्षांची इच्छा पूर्ण केली.

…तुमच्यामुळेच घरी वीज आली
‘साहेब आज तुमच्यामुळेच आमच्या घरी वीज आली. आज आमच्या आयुष्यातील हा सोन्याचा दिवस आहे,’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. कनिष्ठ अभियंता संदीप बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानताना ग्रामस्थांचे डाेळे पाणावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here