रत्नागिरी : जिल्ह्यातील चार उपविभागीय दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी व चिपळूण प्रांत प्रवीण पवार यांची रायगड येथे बदली झाली आहे. तर कोकण भवन येथून निशाताई कांबळे यांची रत्नागिरी भूसंपादन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. रत्नागिरीचे प्रांताधिकारी म्हणून विकास सुर्यवंशी यांनी चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी बजावली. कोरोना काळामध्ये नागरिकांच्या दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. रत्नागिरी विमानतळाच्या वाढीव कामासाठी जागा ताब्यात घेण्यापासून जागा मालकांना अधिकचा दर मिळावा म्हणूनही त्यांनी वेगाने पावले उचलली.
रायगड जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारीपदी त्यांची बदली झाली आहे. तर चिपळूण येथे महापूरासह कोरोना काळात चांगली कामगिरी बजावणारे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांचीही रायगड भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दापोलीचे उपजिल्हाधिकारी शरद पवार यांची निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन म्हणून जबाबदारी पार पाडणार्या सविता लष्करे यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोकण भवन येथून निशाताई कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. रत्नागिरी, चिपळूण व दापोली ही तीनही पदे रिक्त ठेवण्यात आली असून, लवकरच या जागांवर अधिकार्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 09-05-2023