रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल गोळे यांच्यासह सहाजणांच्या सुटकेसाठी उपोषण

0

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे. आंदोलन करणाऱ्या अटक झालेल्या अमोल गोळे यांच्यासह अन्य सहाजणांची तात्काळ सुटका करावी आणि पोलिसांची दडपशाही थांबवावी, या मागणीसाठी सोमवारी गोवळ येथे ग्रामस्थांनी उपोषण आणि धरणे आंदोलन केले.

25 एप्रिलपासून रिफायनरी प्रकल्पाविरोधात बारसू येथे आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी शेकडो ग्रामस्थांना अटक करण्यात आली. अनेकांना जिल्हाबंदी आणि तालुकाबंदीच्या नोटीसा देण्यात आल्या. आंदोलकांच्या महामोर्चावेळी लाठीमारही करण्यात आला. 5 मे रोजी रानवाटेने आंदोलक बारसूच्या सड्यावर पोहोचले होते. त्यावेळी पोलीसांनी रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल गोळे यांच्यासह सहाजणांना अटक केली. त्यांना अद्यापही सोडले नसल्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी सोमवारी ग्रामस्थांनी गोवळ नवलाईदेवी येथे उपोषण आणि धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात अध्यक्ष अमोल गोळे आणि सहाजणांची तात्काळ सुटका करावी. पोलीसबळाचा गैरवापर सुरू आहे तो थांबवावा आणि माती परीक्षण थांबवावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास राजापूर तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 09-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here