नैसर्गिक संकटामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम

0

रत्नागिरी : मासेमारीच्या चालू हंगामात मच्छिमारांचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले असले तरी नंतरचा बराचसा हंगाम नैसर्गिक संकटांना तोंड देत जात आहे.

सततच्या वातावरणातील बदलाने उद्भवणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे अनेकदा मासेमारी ठप्प झाली होती. आता खोल समुद्रातील मासेमारी हंगाम १ जूनपासून बंद हाेणार आहे, त्यामुळे या हंगामाचे वीसच दिवस राहिले आहेत.

दरवर्षी खोल समुद्रातील मासेामरी १ जून ते ३१ जुलै अशी बंद ठेवण्यात येते. मात्र, पर्ससीन मासेमारीला केवळ जेमतेम चारच महिने मिळतात. मार्च, एप्रिल आणि मे हे ३ महिने मासेमारीसाठीच्या हंगामातील महत्त्वाचे समजले जातात. या हंगामात मोठ्या प्रमाणात मासळी मिळते. मात्र, मच्छिमारांची दरवर्षीप्रमाणे यंदाही घोर निराशा झाली आहे. चांगल्या प्रतीचे मासे मिळत नसल्याने मच्छिमारांना डिझेलचा खर्चही भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक अडचणीत आहे.
दरम्यान, मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासूनच नैसर्गिक आपत्तीने मासेमारी व्यवसाय संकटात सापडलेला आहे. प्रत्येक पंधरवड्यानंतर अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नौका किनाऱ्यावर नांगराला बांधून ठेवाव्या लागतात. असे प्रकार या चालू हंगामात सर्रासपणे सुरू असल्याने मच्छिमारांना खलाशांचे पगार भागवताना नाकीनऊ येत आहेत. त्यातच मासळी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने बँकांचे हप्ते तर थकीत आहेत. शिवाय व्यापाऱ्यांकडून घेतलेले पैसेही वेळेवर फेडू शकत नाहीत.

हंगाम निराशाजनक
मासेमारी हंगाम ३१ मेपर्यंत चालणार असला तरी मासे मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेक नौका मालकांनी नौकेवर जाळी काढून ती धुणे आणि सुकविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मासेमारी हंगाम निराशाजनक चालल्याने मच्छिमारांसमोर भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

खलाशांचे पलायन
दरवर्षीप्रमाणे चालू मासेमारी हंगामात कमी घडलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा मासेमारी नौका खलाशांअभावी बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मासेमारी नौका बंद राहिल्यास त्याचा परिणाम इतर व्यवसायावरही होत असतो. त्यांना नाैका बंद असल्याचा फटका नेहमीच बसतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 09-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here