नाशिक : सध्या तरी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असे मत विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. अडीच वर्षांपूर्वीच मला खासदारकीची ऑफर होती; पण सध्याचे राजकारण अस्थिर आणि गढूळ झाले आहे.
शिवाय तो माझा प्रांत नाही. त्यामुळे मला राजकारणात येण्यासाठी कोणताही रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येथील कुसुमाग्रज स्मारकात सुरू असलेल्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात रविवारी स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲड. निकम यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
सुमारे दीड तास ही मुलाखत रंगली. सुमारे २५ वर्षांपूर्वी मालेगाव येथे घडलेल्या पेट्रोलपंप लूट प्रकरणातील टाडा कोर्टातील खटल्यानंतर मला मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्याची जबाबदारी मिळाली होती. आपल्याला मिळालेल्या संधीचे वेळीच सोने करता आले पाहिजे आणि मी ते केले असे ते म्हणाले. तसा मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी, २ टक्क्यांनी माझा वैद्यकीयचा प्रवेश हुकला आणि पुढे मी वकील झाल्याचे त्यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गुन्हेगारांमध्येही स्वतः प्रती आदर निर्माण करण्याची ताकद ही सरकारी वकिलांमध्ये असते, ही गोष्ट आपोआप येत नसते, त्यासाठी अभ्यास लागतो. वाचन करावे लागते. माणसाची मानसिकता तयार करण्याची प्रक्रिया लेखक करतात, असेही अॅड. निकम म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 09-05-2023
