रत्नागिरी : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या नव्या घरांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या सोडत काढण्यात येणार आहे.
यामध्ये प्रकल्पातील ६२१ आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील, तसेच १० मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीत शिल्लक घरांचा दिवाळीतील सोडतीत समावेश असणार आहे.
नवीन सोडत प्रक्रियेच्या माध्यमातून कोकण मंडळाची ४ हजार ६५४ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. मात्र, अनेक इच्छुक वेळेत आवश्यक कागदपत्रे जमा न करू शकल्याने ते या सोडतीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळेच या सोडतीसाठी खूपच कमी अर्ज सादर झाले आहेत. मात्र ज्यांना अर्ज करता आला नाही किंवा मुंबई महानगर प्रदेशात हक्काचे घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी कोकण मंडळाने येत्या दिवाळीत सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकल्पातील ६२१ घरे मंडळाला उपलब्ध होणार आहेत, तर २० टक्के योजनेतील आणखी काही नवीन घरेही उपलब्ध होणार आहेत. तसेच कोकण विभागातील मंडळाच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरेही पूर्ण होणार आहेत. १० मेच्या सोडतीत शिल्लक राहणाऱ्या घरांचा समावेश दिवाळीदरम्यान काढण्यात येणाऱ्या सोडतीत करण्यात येणार आहे. या घरांच्या किमती लवकरच निश्चित करण्यात येणार असून, बाजारभावाच्या तुलनेत किती तरी पटीने ही घरे स्वस्त असतील, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 09-05-2023
