मुंबई : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत.
वन वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि नविन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, वाढते शहरीकरण त्याचबरोबर वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपुलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता आहे.
जे प्रकल्प जमीन संपादनाअभावी रखडलेले आहेत त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत जमीन संपादन करावी. याकामी वेळ जात असल्याने प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होते त्यामुळे लवकरात लवकर जमीन संपादन करून प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 09-05-2023
