रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्यामुळे दिवसभरात सुमारे २० हजारहून अधिक भक्तांनी मंदिरात श्रींचे दर्शन घेतले.
पहाटेला पूजाअर्चा झाल्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनाला सुरवात झाली. दर्शन रांगांमध्ये शिस्तबद्धपणे उभे राहून भाविक दर्शन घेत होते. संकष्टनिमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळेतर्फे मंदिरात श्रींच्या मूर्तीपुढे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी ही आरास केली होती.
दिवसभर उन्हाचा कडाका असल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडप घालण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या पडलेल्या असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले पर्यटक श्रींचे दर्शन घेत होते. संकष्टीला अनेकवेळा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची सर्वाधिक गर्दी असते. यावेळी मे महिन्यातील संकष्टीला सर्वच जिल्ह्यातील भाविक उपस्थित होते. किनार्यावर गणपतीपुळे मंदिर देवस्थानतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्यात पोहण्यासाठी जाणार्यांवर लक्ष ठेवता येत आहे. ग्रामपंचायत, देवस्थान, पोलीस प्रशासनाने किनार्यावर जीवरक्षकांची नियुक्ती केली होती. सायंकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:58 09-05-2023
