रत्नागिरी : राज्यातील महिला प्रवाशांना एसटीच्या प्रवासात ५० टके सवलत मिळाली असली तरी ऑनलाइन तिकीट काढताना ती सवलत मिळत नव्हती. मात्र आता त्यातील अडचणी एसटी महामंडळाने दूर केल्या आहेत.
राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महिलांना एसटी तिकीट दरात ५० टके सवलत देण्यात आली आहे. याची अंमलबजावणी गेल्या १७ मार्चपासून सुरू झाली. या योजनेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज सुमारे १८ लाख महिला आपल्या कुटुंबांसह एसटीने प्रवास करत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटीच्या उत्पन्नातदेखील वाढ झाली असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.
महिलांना ऑनलाइन तिकीट बुक करताना ५० टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे महिलांना एसटी आगार आणि अधिकृत तिकीट दलालांकडून तिकीट काढावे लागत होते. यामुळे महिलांची गैरसोय होत होती. याबाबत अनेक महिला प्रवाशांनी एसटी आगारांकडे तक्रारदेखील केली होती. अखेर महिलांची ही अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने ऑनलाइन तिकीट बुकिंगमधील तांत्रिक अडचण दूर केली आहे. त्यामुळे महिलांना ऑनलाइन सुविधा प्राप्त झाली आहे.
महिला सन्मान योजनेमुळे दररोज १८ ते २० लाख महिला एसटीने प्रवास करत आहेत. गेल्या महिन्यात दररोजच्या महिला प्रवाशांची संख्या ९ लाखांनी वाढली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 10-05-2023
