म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी आज सोडत; 4,640 घरं आणि 14 भूखंडांसाठी लॉटरी

0

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4 हजार 640 घरे आणि 14 भूखंडांसाठी आज ठाण्यात सोडत होणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे.

सोडतीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यानुसार एकूण 49 हजार 174 अर्ज पात्र ठरले आहेत. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडाची (Mhada) सोडत होणार आहे.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण विभागाने ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या घरांसाठी ही सोडत होणार आहे. या सोडतीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil), ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai), राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत पार पडणार आहे.

आज म्हाडा कोकण मंडळाची संगणकीय सोडत होणार आहे. या सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे सोयीचे नियोजन करण्यात आले आहे. अर्जदारांना निकाल पाहता यावा यासाठी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या आवारात देखील मंडप उभारण्यात आला आहे. नाट्यगृहात संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आले आहेत.

‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही bit.ly/konkan_mhada या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएस (SMS) द्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती कळवली जाणार आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर सूचना पत्र पाठवले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठवले जाणार आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी सोडतीत प्रधानमंत्री आवासयोजनेअंतर्गत खोणी-कल्याण, शिरढोण, विरार-बोळिंज वगोठेघर येथील योजनेतील एकूण 984 सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेला केंद्र शासनाची मंजुरी असून योजनेमधील सर्व सदनिकांना केंद्र शासनाचे 1.50 लाख व राज्य शासनाचे 1 लाख अनुदान मिळणार आहे. या योजनेत अनामत रकमेसह 352 अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विरार बोळिंज येथील 2 हजार 48 सदनिकांचा समावेश असून अनामत रकमेसह 369 अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्याने सदनिका वितरित केली जाणार आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीसाठी 8 मार्चपासून नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्या यादीनुसार 49 हजार 174 अर्ज सोडत प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी 351 अर्ज, 20 टक्के सर्वसमावेश योजनेसाठी 46 हजार 16 अर्ज, म्हाडाच्या घरांसाठी 2 हजार 438 अर्ज आणि प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी 369 अर्ज पात्र ठरले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here