दापोलीला अवकाळी पावसाने झोडपले…

0

दापोली : दापोलीत मंगळवारी पहाटेपासूनच विजेच्या कडकडाटात बरसलेल्या पावसाने दापोलीला अक्षरशः झोडपून काढले.

अचानकपणे कोसळलेल्या पावसामुळे बेसावध शेतक-यांच्या शेतीचे, आंबा बागातदारांच्या आंबा फळ पिकाचे, मच्छिमारांनी वाळत घातलेल्या मासळीचे तसेच ईतरांनी उघडयावर ठेवलेल्या वस्तूंचे पावसाच्या पाण्यात भिजल्याने मोठेच नुकसान झाले आहे.
दिवसेंदिवस निसर्गातील बदलत्या हवामानाच्या लहरीपणाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांचे अर्थकारण खिळखिळा करणारा असून मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाने दापोलीला चांगलेच झोडपले. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाच्या हवामान केंद्रावर 31.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा हंगाम सुरू होण्याआधीची कोकण कृषी विदयापीठाच्या हवामान केंद्रातील ही या वर्षीची सर्वाधिक पावसाची नोंद आहे. त्यामुळे अवकाळी बरसलेल्या पावसाच्या नुकसानीचा फटका हा आंबा बागायतदारांसह ईतर सर्वांनाच बसला आहे.

दापोलीत मंगळवारी पहाटेपासूनच विजेच्या कडकडाटात जोरदारपणे कोसळलेल्या पावसाने दापोलीला अक्षरशः झोडपून काढले. त्यात तालूक्यातील आंबा बागायतदारांच्या आंबा बागेतील काढण्यास तयार झालेली आंबा फळे गळून खाली पडली. तर रब्बी हंगामातील कडवा, कुळीथ, चवळी, मुग, हरभरा अखेरचे काढणी पिक हातात येण्याऐवजी पावसात भिजल्याने ते मातीमोल झाले. दापोलीत हर्णे, पाजपंढरी, बुरोंडी, आडे, उटंबर, केळशी, दाभोळ आदी ठिकाणांसह तालूक्यात अनेक ठिकाणी मासेमारी व्यवसाय चालतो. मच्छि ओटयांवर, काही ठिकाणी कातळावर कोलीम (जवळा) वाळत घातलेला होता तर पाजपंढरी आणि हर्णे फत्तेगडावर खास बग्या सुकवण्यासाठी तयार केलेल्या मांडवावर वाळत टाकलेल्या बग्या पूर्णपणे भिजून त्यांची नासधुस झाली. गुरांच्या पावसाळी बेगमीसाठी शेतक-यांनी गोठयाच्या माळयावर भरून ठेवण्यासाठी गोठयाजवळ आणून ठेवलेली गुरांची वैरण अचानक कोसळलेल्या पावसाने पार भिजून गेली. तसेच अनेक ठिकाणी शासकिय विकास कामांची बांधकामे प्रगती पथावर आहेत. या बांधकामासाठी आणून ठेवलेल्या सिमेंट बॅगाही काही ठिकाणी पावसात भिजण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे अचानकपणे बरसलेल्या पावसामुळे विविध प्रकारची कामे करण्यासाठी आलेल्या कामगारांचे संसार पाण्याने भिजल्याने कामगारांचे अतोनात नुकसान झाले.

कधी खराब हवामानाचा फटका तर कधी अवकाळी पावसाच्या कोसळण्याने आंबा पिक हे दरवर्षीच धोक्यात येत असते. कोकणात वीस पंचवीस आंब्याची झाडे असलेल्या कित्येक जनांच्या उदरनिर्वाहनाचे साधन हे आंबा पिक आहे मात्र पिक हातात येण्याआधीच लहरी हवामानामुळे भरवषाचे उत्पन्न हातातून अनेकवेळा निसटते. तसे यावर्षीही झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here