स्वरूपानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

0

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन, तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती.

मंगळवारी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेमध्ये कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, अजित रानडे, राजेंद्र सावंत, बापट, गोगटे, संतोष प्रभू, शरद्चंद्र लेले, प्रदीप कुलकर्णी यांच्या संचालक मंडळाने एकमुखाने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सुधीर कांबळे यांनी घोषित केले.

सलग तिसऱ्या कार्यकाळात ॲड. दीपक पटवर्धन स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले ॲड. पटवर्धन यांनी स्वरूपानंद पतसंस्थेचे माध्यमातून सहकार क्षेत्राचा श्रीगणेशा केला.

स्वरूपानंद पतसंस्थेच्या सर्व ४३ हजार सभासदांनी आपल्याला परत एक संधी दिल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले असून आपल्यावर दर्शवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण अधिक द्रुतगतीने वाढवण्यासाठी संचालकांच्या साथीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाखा विस्तार, ३०० कोटींच्या ठेवी, २०० कोटींचे कर्ज हे उद्दिष्ट ठेवत स्वरूपानंद पतसंस्था काम करणार आहे. सहकार क्षेत्रात मिळालेल्या या सातत्यपूर्ण संधीचा उपयोग करत विश्वासार्ह, रचनात्मक, अर्थविश्व उभारता आले, याच समाधान लाखमोलाचे आहे. अनेकविध नवे आर्थिक उपक्रम घेऊन नवनवीन योजना घेऊन स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ग्राहकांसमोर येईल. एखाद्या आर्थिक संस्थेचे अध्यक्षस्थान सलग २० वर्षे भूषवायला मिळणे ही गोष्ट खूप बोलकी आणि माझ्यासाठी अमूल्य आहे. संस्थेच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर काम करत असताना जो अनुभव मिळाला त्यातून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था अधिक विस्तारात गेली. केवळ ३०० सभासद आणि १० हजारांचे भांडवल या अत्यल्प पण मूल्यवान आधारावर सुरू झालेली पतसंस्था आज ४०० कोटींचे खेळते भांडवल, २६३ कोटींच्या ठेवी, १८५ कोटींची कर्जे, ३६ कोटी ८४ लाखाचा स्वनिधी, १७ शाखा, ७ स्वमालकीची प्रशस्त कार्यालये, तालुका क्षेत्रापासून सुरुवात करत राज्य क्षेत्रापर्यंतची मजल, विक्रमी वसुली, १५०० रुपयांच्या निव्वळ नफ्यापासून सुरुवात करत ६ कोटी ६१ लाखांचा सातत्यपूर्ण निव्वळ नफा अशी भक्कम आर्थिक स्थिती घडवण्याची ही संधी माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. सहकारामध्ये झालेले हे रचनात्मक काम आणि त्यातूनच प्राप्त होणारी सातत्यपूर्ण संधी आहे. विश्वासार्हता हा या सर्वांचा गाभा आहे. या नव्या कार्यकाळात सर्व सहकारी, संचालक, कर्मचारी यांच्या सहकार्याने पतसंस्थेचे व्यापक स्वरूप अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न करू, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here