रत्नागिरी : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यांच्या स्मारकाकरिता स्थापन झालेल्या समितीमुळे हे काम पुढे जाईल, असा विश्वास पद्मश्री भिकूजी ऊर्फ दादा इदाते यांनी व्यक्त केला.
दापोली येथे स्थापन झालेल्या महामहोपाध्याय भारतरत्न पां. बा. काणे स्मारक समितीचा पहिला वर्धापनदिन दि. ८ मे ला साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जालगाव येथील आम्रपालीच्या आमराईमध्ये विशेष गौरव समारंभही आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. दादा इदाते यांना पद्मश्री किताब मिळाल्याबद्दल त्यांचा तसेच अमृतमहोत्सवानिमित्त हास्यकवी अशोक नायगावकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. जालगावचे नवनिर्वाचित सरपंच अक्षय फाटक, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, देणगीदार श्रीमती जोशी आणि देवर्षि नारद पुरस्कारविजेते पत्रकार प्रमोद कोनकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
श्री. इदाते यांनी आपल्या भाषणात महामहोपाध्याय काणे यांच्या समग्र जीवनचरित्राचा आढावा घेतला. त्यांनी लिहिलेल्या हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथासाठी त्यांना महामहोपाध्याय ही पदवी मिळाली. अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे फेलो, उपाध्यक्ष, पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशेधन मंदिराच्या नियामक मंडळाचे सदस्या, महाभारत संपादन मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, दापोली एज्युकेशन सोसायटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इत्यादी संस्थांचेही ते पदाधिकारी होते. मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू, राज्यसभा खासदार अशी पदेही त्यांनी भूषविली होती. पण त्यांनी सुमारे २०० ग्रंथ लिहिले, असेही श्री. इदाते यांनी सांगितले. कोकणाने आतापर्यंत एकूण सहा भारतरत्ने देशाला दिली असून त्यातील तीन रत्ने एकट्या दापोली तालुक्यातील आहेत, याचा उल्लेख श्री. इदाते यांनी केला.
काणे यांच्या स्मारकासाठी दापोली अर्बन बँक शक्य ती मदत करण्याचे आश्वासन श्री. जालगावकर यांनी दिले. सरपंच म्हणून आवश्यक ते सहकार्य जालगाव ग्रामपंचायतीमार्फत दिले जाईल, अशी ग्वाही सरपंच अक्षय फाटक यांनी दिली. स्मारकाला दिलेल्या देणगीविषयी श्रीमती जोशी यांनी आपली भूमिका मांडली. सोशल मीडियाच्या आजच्या युगात पां. वा. काणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भारतरत्ने आणि नररत्नांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य ती प्रसिद्धी देणे ही माझ्यासह पत्रकारांची जबाबदारी असून ती मी स्वीकारतो, असे श्री. कोनकर यांनी सांगितले. हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सादर केलेल्या बहारदार कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
प्रास्ताविकात अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी स्मारक समितीच्या कार्याची तसेच भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. डिजिटल चित्ररथ, जिल्ह्यातील सर्व भारतरत्ने तसेच दहा महनीय व्यक्तींची माहिती देणारा कक्ष, शिष्यवृत्त्या, सभागृह इत्यादींचा समावेश त्यात होता.
कार्यक्रमापूर्वी सकाळी पां. वा. काणे यांची जन्मभूमी असलेले परशुराम (ता. चिपळूण) आणि मोरडे (ता. खेड) येथील जन्मगाव तसेच त्यांचे शिक्षण झालेल्या दापोलीच्या ए. जी. हायस्कूलमध्ये काणे यांना अभिवादन करणारी यात्रा काढण्यात आली.
समितीचे कार्याध्यक्ष विमलकुमार जैन, उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते, कार्यवाह रमेश जोशी, खजिनदार विनय माळी, सदस्य अॅड. नूतन परांजपे, विनायक बाळ, अमोल गुहागरकर, मनीष आपटे यांच्यासह सर्व पदाधिकारी अन्य मान्यवर समारंभाला उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 10-05-2023