रत्नागिरी : महाविकास आघाडीतील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत. आपण जबाबदारीने हे बोलत आहोत आणि त्याची प्रचिती लवकरच महाराष्ट्राला येईल, असा गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.
गेले काही दिवस महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे अंतर्गत पातळीवर आघाडीत बिघाडी झाली आहे. तीनही पक्ष एकत्र नसतील तर पुढच्या सर्व निवडणुका अवघड होतील, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेच मंत्री सामंत यांच्या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लोक सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. लवकरच हा बदल राज्याला दिसेल. हे विधान आपण जबाबदारीने करत आहोत, असे ते म्हणाले.
१७२ आमदार आमच्या पाठीशी आहेत. आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.
माती परीक्षण लवकरच संपेल
बारसूमधील माती परीक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. तीन-चार दिवसात माती परीक्षणाच्या बोअर मारून पूर्ण होतील. त्यानंतर ही माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवली जाईल आणि प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच प्रकल्पाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. बारसू येथील कातळशिल्प प्रकल्पामध्ये घेण्यासंदर्भात कुठलाही विचार नाही. ते शेतकऱ्यांकडेच राहील, त्यानंतर सरकार किंवा कंपनीच्या माध्यमातून ही कातळ शिल्प विकसित होतील, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 10-05-2023
