सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

0

रत्नागिरी : आपणच जगातील एकमेव प्रवक्ते आहोत, अशा थाटात कुणालाही सल्ला देणार्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती आहेत, याचा विचार करावा.

राजकारणात भान असणे आवश्यक आहे, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी आज, बुधवारी मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांचा समाचार घेतला. खासदार राऊत यांच्या पक्षाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यावर मंत्री सामंत यांनी जोरदार हल्ला केला.

महाविकास आघाडीची मोट ज्या शरद पवार यांनी बांधली, त्यांच्यावरच आता टीका केली जात आहे. सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले आहे. त्यामुळे त्याचे राऊत यांनी आत्मचिंतन करावे, असे सामंत यांनी सांगितले.

आतापर्यंत जे आम्हाला सल्ले देत होते, तेच आता शरद पवार यांनाही सल्ले देत आहेत. त्यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राने पाहिला आहे. प्रत्येकाच्या पक्षात वाकून बघायचे, हा काय प्रकार आहे, अशा शब्दात पवार यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण आम्ही जे पूर्वीपासून सांगत होतो, तेच आता शरद पवारही सांगत आहेत. यांची दखल घेत नाही, असे पवार यांनी सांगितले आहे आणि तेच महत्त्वाचे आहे, असे सामंत यांनी सांगितले.

पवारांनी सर्वच पक्षांना रामबाण सल्ला दिला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसिद्ध होत असल्याने अनेकांना दु:ख होते. सकाळी साडेनऊ वाजताही तेच होते. यावर शरद पवार यांनी सर्वच पक्षांना रामबाण सल्ला दिला आहे. तो म्हणजे हे जे काही बोलतात, त्याकडे दुर्लक्ष करा, असे पवार यांनी म्हटले आहे. तेच बरोबर आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

यांचे सर्व खोके एकनाथ शिंदेंनी बंद केले

एकनाथ शिंदे यांनी काही खोके कर्नाटकला दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा समाचार घेताना मंत्री सामंत म्हणाले की, दहा महिन्यात यांना खोकल्याशिवाय काही दिसलेले नाही. यांचे सर्व खोके एकनाथ शिंदे यांनी बंद केले आहेत. त्यामुळे यांना स्वप्नातही खोकेच दिसत आहेत. जे खोके घेत होते, जे महानगरपालिकेमध्ये बोके होते, त्यांचा सर्व चरितार्थ थांबल्यामुळे आता त्यांची चिडचिड होत आहे. त्यामुळे या नैराश्येतूनच सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद होत आहे, अशी टीका सामंत यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here