जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका म्हणून घोषित; राज्य सरकारची घोषणा

0

मुंबई : जालना नगरपालिकेचे (Jalna Municipality) रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत. याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे.

राज्य शासनाच्या वतीने जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. दरम्यान आता या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.

अशी आहे जालना शहराची ओळख…

मराठवाड्यात जालना जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. स्टील इंडस्ट्रीमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील राज्यभरातच नव्हे तर देशातील अनेक भागात जालना जिल्ह्यातून जाते. त्यामुळे या शहरात मोठी औद्योगिक उलाढाल पाहायला मिळते. सोबतच कृषीच्या दृष्टीने देखील जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मोसंबीचं मोठ उत्पादन होत असून, दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो.

राज्यातील एकूण महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका (PMC), नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, वसई-विरार शहर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, अकोला महानगरपालिका ,उल्हासनगर महानगरपालिका, सांगली, मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, लातूर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, परभणी महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here