आमदार अपात्रतेबाबत निकालाची शक्यता, राज्यपालांचा सातारा जिल्हा दौरा लांबणीवर

0

सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे दि. १० व १७ या काळात सातारा येथील महाबळेश्वर दौऱ्यावर येणार होते.

मात्र, हा दौरा अचानक लांबणीवर पडला आहे. हा दौरा का पुढे ढकलला, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि साेळा आमदारांबाबत निकाल लागण्याच्या शक्यतेमुळे हा दौरा लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे उन्हाळ्याच्या सुटीसाठी राज्यपाल हे दरवर्षी येतात. यावर्षी राज्यपाल रमेश बैस हे दि. १० ते १७ मे या काळात महाबळेश्वर येथे येणार होते. राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, पहिल्यांदाच बैस जिल्ह्यात येत असल्याने, प्रशासनाने दौऱ्यासाठी तयारी केली होती. त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक कार्यक्रम होणे अपेक्षित होते, परंतु हा दौरा लांबणीवर गेला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दौरा लांबणीवर गेला असला, तरी पुढील तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

आमदार अपात्रतेबाबत निकालाची शक्यता

उच्च न्यायालयात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आमदार अपात्रतेबाबतच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. हा निकाल पुढील काही दिवसात लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसे झाले तर राज्यपालांना महाबळेश्वरहून पुन्हा आपला मुक्काम मुंबईला हलवावा लागेल. यामुळे त्यांनी आपला दौराच काही काळासाठी पुढे ढकलला असल्याची चर्चा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here