जनसेवा ग्रंथालय घरपोच पुस्तके देणार

0

रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाने मोबाइल लायब्ररी उपक्रम पुन्हा सुरू केला आहे. वाचकांना घरपोच पुस्तके देण्याचा हा उपक्रम आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे वाचकाला ग्रंथालयात जाण्यासाठी वेळच मिळणे कठीण झाले आहे.

याशिवाय आजारपण, वृद्धत्व, प्रवास करण्यातील अडचणी, ग्रंथालय आणि वाचकांचे वेळेचे गणित न जमणे, न परवडणारा रिक्षाचा प्रवासखर्च अशा अनेक कारणांमुळे पुस्तक बदलण्यासाठी ग्रंथालयात जाणे लांबते. यामुळे भरपूर वाचायची इच्छा असूनही ग्रंथालयात जाता येत नाही. अशा रत्नागिरी शहरातल्या वाचकांसाठी ‘मोबाइल लायब्ररी’ हा उपक्रम पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प जनसेवा ग्रंथालयाने सोडला आहे.

वाचायची इच्छा आहे, पण वेळेअभावी ग्रंथालयात येणे शक्य नसणार्या रत्नागिरी शहरातील वाचकांना घरपोच आठवड्यातून एकवेळा प्रत्येकी २ पुस्तके ग्रंथालयामार्फत पाठविण्यात येतील. यासाठी नेहमीच्या वर्गणीसोबत पुस्तक घरपोच करण्याबाबतचे नाममात्र शुल्क आकारले जाईल. वाचकांच्या मागणीनुसार ग्रंथालय घरपोच पुस्तके देणार असल्यामुळे ग्रंथालयात येण्यासाठीचा वाचकांचा ५० ते ६० रुपयांचा रिक्षा भाडे खर्चही वाचू शकेल. ही योजना रत्नागिरी शहरातील जनसेवा ग्रंथालय कक्षेत असणार्या परटवणे, बंदररोड, टिळकआळी, झाडगाव, तेलीआळी, आठवडा बाजार, जयस्तंभ या भागांसाठी मर्यादित ठेवली आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी, किंवा ज्या वाचकांना या योजनेत सहभागी व्हावयाचे आहे, त्यांनी आपली नावे जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मी चौक, रत्नागिरी येथे किंवा ग्रंथपाल (9405272499) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here