इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार वाढला; कलम 144 लागू, इंटरनेट बंद…

0

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मंगळवारी (9 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून (Islamabad High Court) अटक करण्यात आली.

त्यानंतर देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या संतप्त समर्थकांनी अनेक प्रमुख शहरांमध्ये हिंसक निदर्शने तीव्र केली आहेत. इम्रान खान यांच्या अटकेनंतर राजधानी इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मात्र, इस्लामाबादमध्ये आतापर्यंत हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

इम्रान खान यांच्यावर देशद्रोह, दहशतवाद आणि हिंसाचार भडकवण्याचे आरोप आहेत. इस्लामाबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी इम्रान खान लाहोरहून आले होते. इम्रान यांची कोर्टात बायोमेट्रिक प्रक्रिया सुरु असताना लष्कराच्या जवानांनी कोर्टाची खिडकी तोडून आणि वकील, सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करुन इम्रान खान यांना अटक केली. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरण समजून घ्या…

इम्रान खान हे भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात गेले होते, तेव्हा लष्कराने त्यांना अटक केली. इम्रान खान यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी अनेक शहरांमध्ये हिंसाचार तीव्र केला आहे.

बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा इथे आंदोलक आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये अशाच हिंसाचारात सुमारे 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर राजधानीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. ट्विटरसह सर्व सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. याशिवाय आज 10 मे रोजीही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

इम्रानच्या सुमारे 4,000 समर्थकांनी लाहोरमधील सर्वोच्च कमांडरच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला. आंदोलकांनी पोलिसांची वाहने जाळली आणि प्रमुख रस्ते अडवले.

आंदोलकांनी रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाचीही तोडफोड केली. खान समर्थक घोषणा देण्याबरोबरच इस्लामाबाद पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळावा यासाठी इम्रान कोर्टात गेले होते. तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) वरिष्ठ नेते फवाद चौधरी यांनी 71 वर्षीय इम्रान खान यांच्या अटकेचे वर्णन “अपहरण” असे केले आहे.

पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खानला राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरोच्या कार्यालयात चौकशीसाठी इस्लामाबादजवळील रावळपिंडी येथील गॅरिसन शहरात नेण्यात आले. याशिवाय त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. याशिवाय सीमेवर लष्कराकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान खान यांचे प्रकरण रिअल इस्टेट व्यावसायिकाशी संबंधित आहे. ज्यामध्ये दोघांमधील करारामध्ये देशाच्या तिजोरीचे अनेक कोटींचे नुकसान झाले होते.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही अटक केली जाऊ शकते, असे संकेत पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here