रत्नागिरी : पुराच्या विळख्यात अडकलेल्या पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा सावरण्यासाठी कोकणातल्या हजारोंचे हात सरसावले आहेत. मोठ्या प्रमाणात मदत तिथे जात आहे. रत्नागिरीतुनही यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आवाहन केले आणि अवघ्या काही क्षणात यासाठी हजारो ‘हेल्पिंग हॅण्ड’ सरासावले. अनेक गोष्टींसाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असलेली रत्नागिरी या संकटकाळी कणा म्हणून भक्कमपणे उभी राहिली. पश्चिम महाराष्ट्रात पुरानं थैमान घातलं आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पुरग्रस्तांसाठी सर्वच ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु आहे. या पुरग्रस्तांसाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोशल मीडियातून मदतीचं आवाहन केलं. ‘हेल्पिंग हॅण्ड या नावाने हे आवाहन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळून भरभरून मदतीचा ओघ सुरु झाला. यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. अनेक सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. कुणी धान्य, तर कोणी कपडे, तर कोणी औषधं अशी जमेल तशी मदत अनेकांनी केली आहे. रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात दोन दिवसात मोठ्या प्रमाणात मदत एकत्रित करण्यात आली. त्यानंतरचं पुढचं काम महत्त्वाचं होतं. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या स्वयंसेवकांनीच ही एकत्रित मदत वेगवेगळी त्याचं पॅकेजिंग केलं. गहू, तांदूळ, साखर, तुरडाळ अशा धान्यांची पॅकेट करण्यात आली आहे. तर कपडेही वेगवेगळे करण्यात आले आहेत. त्यानंतर ही मदत रविवारी आणि सोमवारी अशा दोन दिवशी पाठविण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातील पलुस इथं ही मदत पोहचवली जात आहे. जवळपास तीन ट्रक मदत पुरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली. संसार मोडलेल्या आपल्या शेजारील जिल्ह्यांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आवाहनावर ही मदत गोळा झाली. आणखी तीन ट्रक मदतीसाठी जमा झालेले सामान पुरग्रस्तांसाठी जाण्यास सज्ज आहे. काहींनी आपले ट्रकही मदत पोहचविण्यासाठी अगदी मोफत दिले आहेत. पूरग्रस्तांसाठी सामान घेण्यापासून त्याच्या वाटपच्या नियोजनापर्यंत सर्व यंत्रणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उभी केली आहे.
