रत्नागिरी : शहरातील मुख्य बाजारपेठेतील राम आळीतील व्यापाऱ्यांनी एकत्र येत राम आळीत रस्त्यावर अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली होती. यानंतर फेरीवाल्यांच्या एका नेत्याने अशी कारवाई राम आळी पुरती न करता संपूर्ण शहरात करावी अशा मागणीचे निवेदन नगरपालिकेला दिले होते. या सर्व विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आज पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी व फेरीवाल्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर रत्नागिरी शहरासाठी फेरीवाला धोरण तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्याधिकारी यांना दिल्या. यासाठी आवश्यक असणारी फेरीवाल्यांची माहिती गोळा करून जिल्हाधिकारी यांच्यासमवेत येत्या मंगळवारी चर्चा करून मार्ग काढावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना जागा ठरवून द्यावी असेही ते यावेळी म्हणाले.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाला विभाग योजना अंमलबजावणी संदर्भात दिनांक १२ फेब्रुवारी २००७ रोजी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या धर्तीवर महानगरपालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात फेरीवाला धोरण तयार करण्याकरिता महाराष्ट्र शासनास आदेश दिले होते. त्यानुसार नगरपालिकेने स्वतःच्या कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांच्या व्यवसायाचे विनियमन करण्याच्या दृष्टीने उपविधी तयार करायची आहे. यानुसार फेरीवाला धोरण तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:17 10-05-2023