सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी CJI चंद्रचूड यांचे सूचक विधान…

0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा दावा करण्यात येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच CJI चंद्रचूड यांनी या सुनावणीाबाबत विधान केल्याचे सांगितले जात आहे. या विधानामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड समलैंगिक विवाह प्रकरणावर सुनावणी करताना म्हणाले की, उद्या आम्ही घटनापीठाशी संबंधित दोन निकाल देणार आहोत. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले की, समलैंगिक विवाह प्रकरणातील युक्तिवाद दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू होऊ शकतो, कारण सकाळची प्रचंड गर्दी असेल. गुरुवारची सकाळ कामांनी भरलेली आहे. घटनापीठांचे दोन महत्वाचे निकाल द्यायचे आहेत, असे CJI चंद्रचूड यांनी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले.

पाच सदस्यीय घटनापीठ निर्णय देणार
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारी २०२३ पासून नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर आता सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या घटनापीठातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एमआर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.

दरम्यान, सत्तासंघर्षावरील निकाल एकमताने येण्याची शक्यता आहे. हा निकाल फक्त सरन्यायाधीश वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे दोन वेगळ्या निकालांची किंवा घटनापीठात मतभेदांची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here