रस्त्यात झोपून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न..

0

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी खासगी जागेत अतिक्रमण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग तसेच महसूल विभागाकडे तक्रार करून देखील दखल घेतली नाही.

त्यामुळे खेर्डी येथील नयनेश भालचंद्र दळी याने कामथे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला. शिवाय कामथे येथे भर उन्हात राष्ट्रीय महामार्गावर झोपून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दळी यास पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे हरेकरवाडी येथे महामार्गालगत जमिन आहे. या जागेचा न्यायालयीन वाद सुरू आहेत. याच ठिकाणी संपादीत जागेत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू होते. नयनेश दळी यांनी आपल्या जागेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने अतिक्रमण केल्यामुळे बुधवारी सकाळी संरक्षक भिंतीसाठी उभारलेले बांधकाम साहित्य काढून टाकले. यावरून ठेकेदार कंपनी व दळी यांच्यात बाचाबाची झाली. वारंवार पत्र व्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे दळी याने आक्रमक भुमिका घेत महामार्गावर ठिय्या मांडला.

भर उन्हात सकाळी ११.३०च्या सुमारास मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मधोमध झोपून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. तब्बल २५ मिनीटे तो रस्त्यावर झोपूनच होता. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहने थांबली होती. याबाबतची माहिती मिळताच येथील पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दळी याला रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले. परंतू दळी याने नकार देत आपल्याच जागेत महामार्ग विभागाने अतिक्रमण केले आहे. तेथे सरंक्षण भिंतीचे काम सुरू असून ते काढण्यात यावे, अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रीय महामार्गचे कनिष्ठ अभियंता श्याम खुणेकर यांनी सविस्तर माहिती दिली. संपादीत जागेतच संरक्षण भिंतीचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतरही दळी रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेची फिर्याद राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाकडून देण्यात आली आहे. त्याप्रमाणे त्याच्या विरूद्ध शासकीय कामात अटकाव केल्याने व महामार्ग रोखल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here