सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस, पण सर्वांचं लक्ष असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल?, चर्चांना उधाण

0

मुंबई : गेल्या ११ महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये आजचा ११ मे हा दिवस निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेत पडलेली फूट, महाविकास आघाडी सरकारचं पतन, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे.

त्यामुळे सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारसह राज्य आणि देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ येत आहेत. तसेच ते नाशिकमधील दिंडोरी येथील त्यांच्या गावी नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच गावातील नागरिकांनीही ते कुठे असल्याचे माहित नसल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाचा निकाल लागत असतानाच नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर झिरवळ हे त्यांच्या गावी असल्याचे झिरवळ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल सुनावणीदरम्यान ही माहिती दिली होती. गुरुवारचा दिवस भरगच्च कामकाजाचा असेल, असे समलैंगिक विवाह प्रकरणावरील बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना सांगितले. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेला, तसेच सर्व न्यायाधीशांची सहमती लाभलेला ५-०, असा सर्वसंमतीचा असेल, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काल प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितलं होतं की, मी जो काही निकाल दिला होता तो कुठल्याही आकसाने दिला नव्हता. सार्वभौम सभागृह आहे,. ते घटनेवर चालतं. त्या पद्धतीने मी योग्य तो निर्णय दिला होता. त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा निश्चितच विचार करेल. तसेच तत्कालीन अध्यक्ष मी होतो. अपात्रतेचा निर्णय हा माझ्याकडेच येईल, असा विश्वासही झिरवळ यांनी व्यक्त केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here