Maharashtra Political Crisis : सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता : उल्हास बापट

0

पुणे : लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेचा कायदा अगदी स्पष्ट आहे. त्यात कसलीही संदिग्धता नाही. त्यामुळे सत्तास्पर्धेच्या संघर्षात १६ सदस्य कायद्याच्या आधारावर अपात्र घोषित व्हायला हवेत असे मला वाटते.

तरीही निकालाविषयी काहीही सांगता येत नाही. मात्र सध्याच्या सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे असे मत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी लोकमत बरोबर बोलताना व्यक्त केले. त्यानंतरच्या निवडणुकीत मतदारच अंतीम निर्णय देतील असे ते म्हणाले.

राज्यातील सत्तास्पर्धेच्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गुरूवारी अपेक्षित आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकीय वर्तुळात या निकालाविषयी उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर निकालाच्या पूर्वसंध्येला लोकमत बरोबर बोलताना प्रा. बापट म्हणाले, “कायद्यात अपात्रतेच्या विषयीच्या सर्व तरतुदी स्पष्ट आहेत. सत्तासंघर्षात यातील अनेक तरतुदींना हरताळ फासण्यात आल्याचे दिसते. कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तीवादात या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे निकाल सध्याच्या सरकारविरोधात येणे अपेक्षित आहे, मात्र तसे होईलच असे नाही.”

निकाल विरोधात गेला तर १६ सदस्य अपात्र ठरतील. त्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. सरकार अल्पमतात आले तर मग राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू शकते अशी शक्यता प्रा. बापट यांनी वर्तवली. त्यानंतर मुदतीत विधानसभेची निवडणूक घ्यावी लागेल व त्यात मतदारच या सर्व सत्तासंघर्षावर अंतीम निर्णय देतील असे प्रा. बापट म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here