रत्नागिरी : राजापूर तालुक्याचे मूळचे रहिवासी राजेश देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा कै. पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांच्या पुरस्काराची घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे.
सिनेनाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश देशपांडे यांची निवड पुरस्कारासाठी केली आहे. उत्कृष्ट व्यावसायिक नाट्य दिग्दर्शक या पारितोषिकासाठी त्यांचा हा सन्मान करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ २५ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.मराठी रंगभूमीवर सध्या राजेश देशपांडे लिखित ‘करून गेलो गाव’ हे नाटक गाजत आहे. भाऊ कदम व ओंकार भोजने त्यामध्ये अभिनय करीत आहेत. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन श्री. देशपांडे यांनी केलेले आहे. याशिवाय अनेक चित्रपट व नाटकांचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केलेले असून गंगूबाई नॉन मॅट्रिक व इतर अशी एकाचवेळी पाच नाटके केल्याचा त्यांचा विक्रम आहे. अभिनयासोबतच त्यांनी काही चित्रपटांचेही लेखन व दिग्दर्शन केलेले आहे.
राजापूर तालुक्यातील येळवण येथील शिक्षण महर्षी चंदूभाई देशपांडे यांचे ते पुत्र असून त्यांची नाळ आजही कोकणशी जुळलेली आहे. येथील सामाजिक तसेच शैक्षणिक चळवळीत त्यांचा नेहमीच सहभाग आहे. पुरस्काराच्या घोषणेनंतर प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करीत राहायचे. त्याची दखल घेतली जाते, अशी भावना राजेश देशापांडे यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 11-05-2023