मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे.
निकालात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा दिला असला करी घटनापीठाने या प्रकरणातील अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवात साधताना उद्धव ठाकरे यांनी घटनापीठाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
राज्यपालांच्या भूमिकेचं वस्त्रहरण : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड केली आहे. राज्यपालांच्या भूमिकेचं वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरणीय होती, यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्त्वात ठेवावी की नाही हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवं. पण आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळीच शिवसेना म्हणजे माझी शिवसेना यांच्याकडेच राहिल. आता अध्यक्षांनी यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करु.”
…. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला : उद्धव ठाकरे
दरम्यान उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हा या खटल्यातील कळीचा मुद्दा ठरला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे शिंदे सरकार बचावलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सरकारला कोणताही धोका नाही. त्याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जसा मी माझ्या पदाचा राजीनामा दिला तसा कोर्टाच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 11-05-2023
