मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निर्णय दिला.
यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एका मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर ताशेरे ओढले, पण तरीही शिंदे सरकार स्थिर राहिलं त्यासाठी कारण ठरलं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजीनामा. उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिली नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मी राजीनामा दिला नसता तर मी परत मुख्यमंत्री झालो असतो, पण ही लढाई माझ्यासाठी नाहीये, जनतेसाठी आहे, लोकशाहीसाठी आहे, असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी राजीनामा दिला नसता, तर मी परत मुख्यमंत्री झालो असतो. पण ही लढाई माझ्यासाठी नाहीये जनतेसाठी आहे लोकशाहीसाठी आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “कायद्याने मी राजीनामा दिला. गद्दार लोकांनी मझ्यावर अविश्वास आणला होता. याच्यामध्ये नैतिकता असेल तर मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला हवा. माझ्यावर अविश्वास आणला हे मला पटलं नाही. ज्यांना मी सगळं दिलं त्यांनी माझ्यावर अविश्वास आणला हे मला पटलं नाही.”
“गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जसा मी माझ्या पदाचा राजीनामा दिला तसा कोर्टाच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा.” , असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्यांनी देशाला गुलाम केले त्यांना लवकरच तुरुंगात पाठवले जाईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत. राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता. नैतिकता म्हणून बघितलं तर माझ्या वडिलांनी अशा लोकांना सर्वस्व दिलं, मग गद्दारांनी माझ्यावर अविश्वास आणला तर? मी जसा राजीनामा दिला, त्याचप्रमाणे त्यांच्यात जराही नैतिकता असेल तर या दोघांनी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) राजीनामा द्यावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
सरन्यायाधीश उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले?
सत्तासंघर्षाचा निकालाचं वाचन करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, “तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांचे सरकार परत आणलं असतं.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 11-05-2023