Maharashtra Political Crisis : “त्या’ निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल..’; झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया

0

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, शिंदे गट, भाजप आणि राज्यपालांना न्यायालयाने फटकारले.

शिंदे गटाने प्रतोदपदी केलेली भरत गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं. तर, १६ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. मात्र, शिंदे सरकार तरलं असून सध्यातरी राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाची टिपण्णी केली आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं हेच महाविकास आघाडी सरकारच्या अंगलट आलं आहे. यावर विधानसभेचे माजी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांचा विचार झाला असता असं सांगितलं जातं. परंतु राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयानं ताशेरे ओढलेत. तसंच १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे, त्यावर चर्चा होईल. १६ अपात्र झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे सरकार अजूनही टांगणीवर आहे असं म्हणायला हरकत नाही,” अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली.

“आता व्हिप कोण बजावणार हाच प्रश्न आहे. गोगावले चुकीचे आहेत असं न्यायालय म्हणतं. गटनेता योग्य आहे किंवा नाही त्याबाबत संशय तयार होईल. गटनेता आणि प्रतोद पक्षप्रमुखांनी नेमायचे असतात, तर त्यांची बाजू घेण्याचं नाकारता येत नाही,” असंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर बरं राहिलं असतं असं न्यायालयाचं आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ते काही अंशी बरोबरही असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोर्टानं ताशेरे ओढलेत त्यावर आम्ही काही म्हणणार नाही. पण जी प्रक्रिया केली होती, त्यावरून १६ आमदार अपात्र केले होते. परंतु प्रत्येकाचं म्हणणं आम्ही केलेलं, राज्यपालांनी केलेलं बरोबर आहे असं म्हणणं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

“अपात्र करण्याच्या विचारावर चर्चा होणारे असं मी ऐकलंय. निकाल सांगतो की एकनाथ शिंदेंचं सरकार सध्या राहणार आहे. १६ आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीतला निर्णय होणं बाकी आहे. जर ते १६ आमदार अपात्र झाले, तर सरकार स्थिर कसं,” असंही झिरवळ म्हणाले. त्यावेळच्या प्रक्रियेत नार्वेकर नव्हते. मी आज तिथं नसतो तर ते प्रकरण माझ्याकडे आलं नसतं. पण आज मी तिकडेच आहे. तो निर्णय आजही आपल्यासमोरच होईल, असंही ते म्हणाले.

“सरकारला दिलासा मिळालाय अशी बाहेरून चर्चा होतेय. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून शिंदे मुख्यमंत्री आहेत. १६ आमदारांचा अपात्रतेचा निर्णय बाकी आहे, त्यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे,” असंही झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here