”उद्धवजी, तुम्ही लाजेपोटी आणि भीतीपोटी राजीनामा दिलात, त्याला नैतिकतेचा मुलामा देऊ नका”

0

मुंबई : शिवसेनेत झालेलं बंड, महाविकास आघाडी सरकारचं पतन आणि राज्यात झालेलं सत्तांतर या घडामोडींबाबत सर्वोच्च न्यायालयांमध्ये दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल सुनावला. हा निकाल सुनावताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालीन राज्यपाल, शिंदे गटावर ताशेरे ओढले.

मात्र पूर्वस्थिती बहाल करून उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवता येणार नाही, असेही स्पष्ट केले. त्याबरोबरच या प्रकरणात कळीचा मुद्दा असलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीसांमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहिली. त्यांची पत्रकार परिषद मी सहसा पाहत नाही. मात्र आज पाहिली. त्यात त्यांनी आपण नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले होते, तेव्हा त्यांनी नैतिकता कुठे होती कुठल्या डब्यात बंद केली होती. जनादेश डावलून मविआ स्थापन केली तेव्हा नैतिकता कुठे होती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, तुम्ही नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला नव्हता, तर आपल्या मागे संख्याबळ नाही, त्यामुळे पराभव होईल, .या भीतीने तुम्ही राजीनामा दिला. नैतिकतेवर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही.उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडले आणि शिंदेंनी विचारांसाठी खुर्ची सोडली, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here