मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल सुनावला. आजच्या निकालातील ठळक वैशिष्ट्ये सांगताना, सुप्रीम कोर्टाने राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले.
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन अविश्वास प्रस्तावाचे पत्र दिले असले तरी राज्यपालांनी मात्र याबाबत थेट फ्लोअर टेस्टची मागणी करणे घटनाबाह्य होते अशा आशयाचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने विविध प्रतिक्रिया आल्या. पण अखेर या निकालाच्या सुमारे, तीन तासानंतर खुद्द भगतसिंह कोश्यारी यांनी या विषयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले तत्कालीन राज्यपाल कोश्यारी?
“मी कधीच पदमुक्त झालो आहे. मी राज्यपालपद सोडून आता तीन महिने झाले आहेत. मी राजकीय बाबींपासून नेहमीच अंतर ठेवून असतो. जो विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी होता, त्यावर त्यांनी निर्णय दिला आहे. अशा बाबींवर कायद्याचे जाणकारच आपले मत व्यक्त करू शकतात. मी कायद्याचा अभ्यासक नाही, मी केवळ संसदीय कार्यशैली जाणतो, त्यामुळे मी यावर बोलणे उचित ठरणार नाही. मी त्यावेळी जे निर्णय घेतले ते पूर्णपणे विचार करून घेतले होते. जर एखादा व्यक्ती माझ्याकडे राजीनामा घेऊन आला, तर मी त्याला, राजीनामा देऊ नको, असं म्हणणार का..?? सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटले आहे त्यावर विवेचन करणे हे तुम्हा लोकांचे काम आहे. मी त्यावर टिपण्णी देणार नाही,” असे ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 11-05-2023
