रत्नागिरी : बारसू रिफायनरीसाठी सुरु असलेले माती परिक्षण आता अंतिम टप्प्यात आले असून, ग्रामस्थांनीही पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. धुतपापेश्वर गावातील ग्रामस्थांनीही आता समर्थन दिले असून अन्य गावातील लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, बारसू परिसरातील गावांमध्ये माती परिक्षणासाठी बोअर खोदण्याचे काम आता पूर्ण होत आले आहे. जवळपास 75 बोअर खणण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणा, महसूल प्रशासन याठिकाणी ग्रामस्थांना विश्वासात घेण्यासाठी सातत्याने संपर्क ठेवून आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने सात ते आठ बैठका येथील ग्रामस्थांसोबत आयोजित केल्या होत्या.
बारसू परिसरातील अगदी मोजकेच ग्रामस्थ विरोध करण्यात होते, मात्र आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांची संख्या अधिक होती, अशी माहिती प्रशासनाकडूे उपलब्ध आहे.
प्रस्तावित रिफायनरी परिसरातील गावामधील साध्या, भोळ्या भाबड्या ग्रामस्थांना काही एनजीओची मंडळी दबाव टाकून, चुकीच्या पध्दतीने माहिती देऊन भडकावत असल्याचे दिसून आले आहे. या मंडळींना प्रशासनाचे ऐकूण घेण्यात स्वारस्य नसल्याचे आढळले आहे. काही मंडळी मुंबईतून येऊन स्थानिकांना भडकावण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले आहे. समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकून चुकीची माहिती दिली जात असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.
देशातील काही शास्त्रज्ञ, अभ्यासक यांनीही ग्रीन रिफायनरी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही रिफायनरी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनीही रिफायनरीच्या सुरक्षिततेची माहिती घेतली आहे. प्रशासनासोबतही त्यांनी संपर्क केला असून, येथील परिस्थिती जाणून घेतली असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
धुतपापेश्वर गावातील ग्रामस्थांनीही आता या प्रकल्पाला समर्थन दिले असून, काही मागण्या मात्र प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. त्यांच्या मागण्यांचा योग्य विचार केला जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. सध्या येथील परिस्थिती शांत असून पोलीस व प्रशासन योग्य पध्दतीने काम करीत असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 11-05-2023