✍️ डॉ. समीर जोशी
वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय व्यावसाईकांइतकेच परिचारिकांचे अमूल्य असे योगदान आहे.
वैद्यकीय व्यावसायिक व रुग्ण यामधील महत्वाचा दुवा म्हणजे परिचारिका.जागतिक स्तरावर जसे मातृदिन, पितृदिन आणि इतर बरेच दिवस साजरे केले जातात तसाच परिचारिका दिन ही साजरा केला जातो.आधुनिक नर्सिंगच्या जन्मादात्या म्हणून लेडी फ्लोरेन्स नायटिंगेल ह्या जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्मरणार्थ आणि परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून १२ मे ह्या त्यांच्या जन्मदिनी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो.
१२ मे १८२० रोजी इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात फ्लोरेन्स यांचा जन्म झाला.
सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण इंग्लंडमध्ये झालं. त्यांना वयाच्या १६ व्या वर्षी जाणीव झाली की आपला जन्म रुग्ण सेवेवेसाठी झाला आहे.फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं. रुग्ण, गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती. आणि म्हणूनच त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिलं जात नसे.त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटूंबाचा ह्याला विरोध होता.पण फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि १८५१ मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली.१८५३ मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं.
१८५४ मध्ये क्रीमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं तेव्हा या युद्धात अनेक सैनिक जखमी झाल्याचं आणि मृत पावल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी नसल्याने आजार वेगाने वाढत होते आणि त्यामुळे विविध आजरांच्या प्रादुर्भावामुळे अनेक सैनिकांचा मृत्यू झाला होता.
अश्यावेळी अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. आणि त्यांनी विकसित केलेल्या आधुनिक सुश्रुषेमुळे व रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यू दर ही ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला होता.
नायटिंगेल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करत असत. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची सुश्रुषा व देखभाल करत असत आणि त्या मुळेच सैनिक प्रेमाने आणि आदराने त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ असे म्हणत असत.
कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो.रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाची निःस्वार्थीपणे सेवा करत असतानाच त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. सध्याच्या घडीलाही करोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत असतात याचा प्रत्यय नुकत्याच करोनासारख्या महामारीच्या वेळी अनेक रुग्णांना आला असेल. ह्या महामारीच्या काळात आपल्यामुळे घरातील इतर सदस्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून अनेक रुग्णालयातील परिचारिका तर कित्येक महिने आपल्या घरीदेखील गेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. वैद्यकीय क्षेत्र हे परिचारिकांशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
✍️ डॉ. समीर जोशी
रत्नागिरी
१२.०५.२०२३
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 12-05-2023
